गडचिरोली : प्रशासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २० ते ३० मे २०२६ या कालावधीत निवडक ग्रामपंचायतींमध्ये ‘विशेष सर्वेक्षण आणि सेवा संतृप्ती मोहीम’ राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा १०० टक्के लाभ पोहोचवणे, अपूर्ण नोंदी पूर्ण करणे आणि सेवा वितरण प्रक्रिया गतिमान करणे हा आहे. प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम संपूर्ण जिल्ह्यात युद्धपातळीवर राबवली जात आहे.
या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे रविवारी (२४ मे) आपला ताफा घेऊन रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दुर्गम ‘ताटीगुडम’ पाड्यावर दाखल झाले. विशेष म्हणजे, या दौऱ्यात थेट मुख्य सचिव कार्यालयातील चमूचे प्रतीक बावी आणि ऋषिकेश शिर्के हे देखील उपस्थित होते. पहिल्यांदाच मुख्य सचिव कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू थेट खेड्यापाड्यांत आणि दुर्गम पाड्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या विशेष मोहिमेत अहेरी विधानसभेतील मूलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली व तोडसा, अहेरी तालुक्यातील ताटीगुडम, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर आणि भामरागड तालुक्यातील टेकला या विशिष्ट गावांची निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिव कार्यालयातील चमूने शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत या विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या मोहिमेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी थेट लाभार्थ्यांच्या दारात जाऊन माहिती संकलन, कागदपत्रांची पूर्तता आणि १०० टक्के तपासणी करत आहेत.
प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, “या मोहिमेत निवडक गावातील प्रत्येक कुटुंबाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक त्या शासकीय योजनांशी जोडले जाणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून आपली माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा.” या प्रसंगी उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, प्रभारी तहसीलदार प्रतीक आढाव, गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










