Uncategorized

गो-तस्करीच्या जाळ्यावर पोलिसांचा शिकंजा ; २९३ तस्कर पोलिसांच्या रडारवर

चंद्रपूर : जिल्ह्यात वाढत्या अवैध गो-तस्करी, बेकायदेशीर कत्तल आणि मुक्या जनावरांवरील क्रूरतेच्या घटनांवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे जिल्हाभरातील तब्बल २९३ सराईत गो-तस्करांना विशेष प्रतिबंधक कारवाई कॅम्पसाठी हजर करण्यात आले. भविष्यात अशा गुन्ह्यांत पुन्हा सहभागी आढळल्यास थेट मकोकासह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलिस प्रशासनाने दिला.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅम्पमध्ये अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदे पाटील, परिविक्षाधीन उपअधीक्षक सदानंद खत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक सराईत गुन्हेगाराची सविस्तर माहिती, त्यांच्यावर दाखल गुन्हे, हालचाली आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांच्या नोंदीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा आणि गडचांदूर उपविभागातील गो-तस्कर पोलिसांच्या रडारवर असून, संघटित स्वरूपात गो-तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच या अवैध व्यवसायातून उभारलेली मालमत्ता शोधून ती जप्त करण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

गो-तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर सरकारजमा करण्यात येणार आहेत. या गुन्हेगारी साखळीला आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील संघटित गो-तस्करीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई मानली जात आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.