Uncategorized

माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

गडचिरोली : जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, माओवाद्यांनी जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना आणि विविध साहित्य गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, घटनास्थळी सापडलेले सर्व साहित्य जवानांच्या मदतीने जागीच नष्ट करण्यात आले.

माओवादी संघटना सुरक्षा दलांवर हल्ले घडवून आणण्यासाठी जंगल परिसरात शस्त्रे, स्फोटके आणि अन्य साहित्य गुप्तपणे जमिनीत पुरून ठेवत असत. निवडणुका, नक्षल सप्ताह किंवा इतर संवेदनशील काळात या साहित्याचा वापर घातपातासाठी केला जात होता. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात माओवादाचा प्रभाव आता मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, पोलिस दल सातत्याने अशा लपवून ठेवलेल्या साठ्यांचा शोध घेत आहे.

१६ मे २०२६ रोजी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यातून पोमकें-बिनागुंडा परिसरातील जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार २१ मे रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट आणि बीडीडीएसच्या जवानांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली.

२२ मे रोजी पोमकें-बिनागुंडा जंगल परिसरात कसून तपासणीदरम्यान पोलिसांना एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल आणि फुटबॉल पाईपसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य आढळून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. आणि पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली. या धाडसी मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.