Uncategorized

लोढा डाऊनटाऊनमध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड; २१ नायजेरियन नागरिक ताब्यात

ठाणे : ठाण्याच्या डोंबिवली परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक प्रकरण समोर आले आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे गुप्त कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले असून, त्यातील दोन आरोपी हे विविध राज्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेले सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीजवळील पलावा सिटी परिसरातील अत्यंत आलिशान आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘लोढा डाऊनटाऊन’ या सोसायटीत हे सर्व आरोपी बनावट नावांनी राहत होते. पोलिसांच्या तपासात अनेकजण बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अनेक राज्यांतील पोलीस या टोळीच्या शोधात होते. मात्र, पोलिसांची नजर चुकवत हे आरोपी ठाणे जिल्ह्यात लपून राहत असल्याचे समोर आले.

मिळालेल्या गुप्त माहितीनंतर नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी शनिवारी पहाटे संयुक्त ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. संपूर्ण लोढा डाऊनटाऊन परिसराला पोलिसांनी वेढा घालत संशयित फ्लॅट्सवर एकाचवेळी छापे टाकले. पहाटेच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या कारवाईत ताब्यात घेतलेल्या २१ जणांपैकी दोन आरोपी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोस्ट वॉन्टेड ड्रग तस्कर असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचे गंभीर आरोप आहेत. उर्वरित काही आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई आणि परिसरात अमली पदार्थ पुरवठ्यामागे याच टोळीचा हात असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व आरोपींना मानपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या टोळीचे मुंबई आणि डोंबिवली परिसरातील नेटवर्क किती मोठे आहे, त्यांनी कोणाला ड्रग्ज पुरवठा केला, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे ठाणे आणि मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.