Uncategorized

अहेरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह बोलेरो जप्त, १४.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली : जिल्हा पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत देशी-विदेशी मद्यसाठ्यासह बोलेरो कॅम्पर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन अहेरीच्या संयुक्त पथकाने २१ मे २०२६ रोजी सापळा रचून ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे मौजा आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर काळसर तपकिरी रंगाची बोलेरो कॅम्पर (क्र. एमएच १२ एस एक्स ६९८१) उभी असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनातून अवैध देशी व विदेशी दारू विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. सदर प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे व अहेरीचे प्रभारी अधिकारी पो.नि. हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.