अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ साठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी शक्तीप्रदर्शन करत अहेरी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
भाजपच्या वतीने सौ. मायाताई शंकर येल्लूरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून संजना हनुमंत मडावी यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांचे नेतृत्व लाभत आहे. दोन्ही उमेदवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या निवडणुकीसाठी अर्ज पडताळणी प्रक्रिया २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून प्रत्यक्ष मतदान २० जून २०२६ रोजी पार पडणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत अहेरीत प्रचारसभा, भेटीगाठी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भाजपच्या नगरसेविका सुनीता किशोर मंथनवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली असून अहेरीतील राजकीय समीकरणांवर या निकालाचा मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.










