Uncategorized

NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची धडक कारवाई; पुण्यातून मुख्य आरोपी अटकेत

पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक केली आहे. लातूरचा रहिवासी असलेला कुलकर्णी हा नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित रसायनशास्त्र विषयाचा व्याख्याता म्हणून कार्यरत होता. तपासात त्याच्याकडे नीट परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण गैरप्रकाराचा तपास सध्या वेगाने सुरू असून, आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार, एप्रिल २०२६ च्या अखेरीस कुलकर्णीने महिला आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने पुण्यातील आपल्या घरात निवडक विद्यार्थ्यांसाठी गुप्त मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे संभाव्य प्रश्न, त्यांची उत्तरे आणि पर्याय लिहून दिले जात होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी वहीत नोंदवून घेतलेले प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट परीक्षेतील रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या अवैध सत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून मध्यस्थांमार्फत लाखो रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर १२ मे २०२६ रोजी सीबीआयने अधिकृत गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष तपास पथके तयार करून देशभरात छापेमारी मोहीम राबवण्यात आली. गेल्या २४ तासांत विविध शहरांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, डिजिटल पुरावे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी पाच जणांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रश्नपत्रिका फुटीमागील मूळ साखळी, आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांना या रॅकेटमध्ये ओढणाऱ्या मध्यस्थांचा शोध सीबीआय घेत आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे अधिक खोलवर असल्याने पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.