Uncategorized

सिरोंचाच्या विकासाला नवे इंधन : आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे लोकार्पण

सिरोंचा (गडचिरोली) : सिरोंचा शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण पाऊल मानल्या जाणाऱ्या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे उद्घाटन आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कृषी उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा अंतर्गत भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. नागपूर यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटनावेळी घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे परिसर दुमदुमून गेला होता. विधिवत पूजा-अर्चना करून फित कापत या आधुनिक पेट्रोल पंपाचे लोकार्पण करण्यात आले.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला हा पेट्रोल पंप वाहनधारकांसाठी मोठी सोय ठरणार असून इंधनासाठी दूरवर जावे लागण्याची नागरिकांची अडचण आता दूर होणार आहे. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होण्यास मदत होणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामीण व दुर्गम भागात आधुनिक सुविधा पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नसून नागरिकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटनानंतर आ. आत्राम यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, नगराध्यक्ष पद्मा भोगे, तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, बाजार समिती सभापती सतीश गंजीवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पेट्रोल पंपामुळे सिरोंचा शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.