जिमलगट्टा (जि. गडचिरोली) : साध्या शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने अथक मेहनत आणि जिद्दीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात फौजदार (पोलीस उपनिरीक्षक) पद मिळवून विदर्भात अभिमान आणि प्रेरणेची लहर निर्माण केली आहे. समय्या मोगलीवर यांच्या या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बालपणी जिल्हा परिषद शाळेत शिकत असतानापासून खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या समय्या यांना आर्थिक अडचणी आणि ग्रामीण पार्श्वभूमीमुळे अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. २०१९ च्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी हार न मानता त्यांनी मेहनत चालू ठेवली. अखेर २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेत त्यांची निवड झाली.
विशेष म्हणजे, समय्या यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षाही उत्तीर्ण केली होती, परंतु त्यांचे एकच ध्येय होते – खाकी वर्दी. त्यामुळे त्यांनी फौजदार पद स्वीकारले. त्यांच्या यशामागे आई-वडिल, कुटुंबीय आणि गावातील शिक्षकांचे मोठे योगदान आहे. जिमलगट्टा गावातील लोक या यशाचे कौतुक करत आहेत. एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलाने एवढे मोठे यश मिळवल्याने हा यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.








