अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात पंचायत समिती अहेरी अंतर्गत केंद्र बोरी येथील शिवणीपाठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि. २१ जुलै) ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा लोकशाही अनुभव घेण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक, मतदानाचे महत्त्व, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेने हा उपक्रम राबविला. ईव्हीएमच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने मतदान घेण्यात आले आणि त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.
निवडणुकीत अथर्व संतोष तलांडे यांची शालेय मुख्यमंत्री, तर नव्या नाशिक मोहुर्ले यांची शालेय उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
नवनिर्वाचित बाल मंत्रिमंडळ
मुख्यमंत्री – अथर्व संतोष तलांडे
उपमुख्यमंत्री – नव्या नाशिक मोहुर्ले
शिक्षणमंत्री – रिधान्थ हरिचंद निकेसर
क्रीडामंत्री – आरव बलवंत वेलादी
जल व स्वच्छतामंत्री – रुहानी मधुकर वेलादी
आरोग्यमंत्री – ओम अरुण ठाकरे
पोषण आहारमंत्री – समीर राजेश वेलादी
विद्युतमंत्री – श्रेयश श्रीकांत वाढई
शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र रत्नाकर यमसलवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता लोकशाही व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण होण्यास मदत होते.
निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित बाल मंत्रिमंडळाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मीनाताई वेलादी, उपसरपंच सविता कोकीरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनमंतू कुळमेथे, अंगणवाडी सेविका ज्योतीताई कुळमेथे यांच्यासह समिती सदस्य हरिचंद्र निकेसर, सुरेखा ठाकरे, शारदा तलांडे, सुवर्णा मोहुर्ले, रसिका वेलादी तसेच ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा अभिनव शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रविंद्र रत्नाकर यमसलवार आणि सहशिक्षिका सुरेखा नागो मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले. ईव्हीएमच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या अनोख्या निवडणूक उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि उपस्थित नागरिकांनी कौतुक करत शाळेच्या या लोकशाहीवादी उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.










