Uncategorized

नागपुरात उष्णतेचा कहर! अवघ्या ८ दिवसांत ३६ जणांचा मृत्यू

नागपूर : शहरासह संपूर्ण विदर्भाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अवघ्या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ३६ अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला असून, या मृत्यूमागे उष्माघात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या सलग मृत्यूंकडे सुरुवातीला कुणाचंही गांभीर्याने लक्ष गेलं नव्हतं.

सध्या नागपूर शहर अक्षरशः उन्हाने भाजून निघत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी तीन जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये बहुतेक बेघर, रस्त्यावर राहणारे किंवा उन्हात काम करणारे लोक असल्याची माहिती समोर येत आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका याच घटकांना बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या सर्व मृत्यूंचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी प्रशासनाने तपास सुरू केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून सर्व मृत्यूंचं ‘डेथ ऑडिट’ करण्यात येणार असून, अंतिम अहवालानंतरच अधिकृत कारण स्पष्ट होणार आहे. मात्र प्राथमिक तपासात उष्माघाताची शक्यता अधिक असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड तयार ठेवण्यात आले असून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.

दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. बाहेर जाताना डोक्यावर कापड किंवा टोपी वापरणे, भरपूर पाणी पिणे, ओआरएस आणि लिंबूपाणी घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्कर येणे, उलटी होणे किंवा शरीरातील पाण्याची कमतरता जाणवल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात संपर्क साधण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.