गडचिरोली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari देशभरात दर्जेदार महामार्ग उभारल्याचे दावे करत असताना, गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील सुरू असलेल्या कामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेकडो कोटी रुपये खर्चूनही रस्त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र समोर आले आहे.
महामार्गाच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्णत्वास आले असले तरी काही महिन्यांतच अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा, खड्डे आणि उखडलेले थर दिसू लागले आहेत. दुसऱ्या बाजूचे बांधकाम अद्याप सुरू असताना पहिल्याच टप्प्यात रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “काम पूर्ण होण्याआधीच रस्ता खचत असेल, तर पुढील काही वर्षांत परिस्थिती किती गंभीर होईल?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही पुलांना उद्घाटनापूर्वीच भेगा पडल्याचे प्रकार घडले होते, तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आरोप झाले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन करत कामांच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही.
नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्गांना ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्थेसाठी मजबूत रस्ते अत्यावश्यक असताना प्रत्यक्षात सुरू असलेली भोंगळ कामे नागरिकांच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.










