गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या एका गंभीर तक्रारीनुसार, भामरागड तालुक्यातील विविध गावांमध्ये DBT व कृषी विभागाच्या शेततळे योजनांत मोठ्या प्रमाणात अनियमितता व शासन निधीचा अपहार होत असल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली संपूर्ण मंजूर रक्कम संबंधित अधिकारी काढून घेत असून, त्यातील केवळ सुमारे ६० हजार रुपये मशीन धारकाला देत आणि उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवत असल्याचे आरोप आहेत. शेतकऱ्यांना “मशीनधारकास पूर्ण पैसे दिले” असे खोटे सांगून त्यांची फसवणूक केली जात असल्याचीही माहिती आहे.
याशिवाय, प्रत्यक्षात कमी खोदकाम करून चारही बाजूंनी माती चढवून जास्त काम दाखवण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शासन निधीचा मोठा अपहार होत असल्याचे दिसून येते.
तक्रारकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी विनंती केली आहे की, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम, त्या रकमेचे काढणे, मशीनधारकाला दिलेली प्रत्यक्ष रक्कम, मोजमाप पुस्तिका (MB) यांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.










