गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी असे यश येथील अमोल प्रदीप देशमुख यांनी संपादन केले आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून त्यांनी एकाचवेळी एमबीए आणि मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या दोन पदव्युत्तर पदव्या यशस्वीरीत्या प्राप्त केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.
गडचिरोलीतील रहिवासी असलेल्या अमोल देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण कार्मेल हायस्कूलमध्ये झाले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर नांदेड येथील गुरु गोविंदसिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बेंगळुरूमधील एका बँकेत नोकरी सुरू केली.
मात्र, उच्च शिक्षण घेण्याची तीव्र जिद्द आणि जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी कायम जपले. नोकरी सांभाळत त्यांनी एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी केली आणि उत्कृष्ट यश मिळवत अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी त्याचवेळी मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेत दोन्ही पदव्या एकत्र पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
कष्ट, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर अमोल देशमुख यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच गडचिरोलीतील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अमोल यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याचा संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.










