आलापल्ली : येथील कु. अनन्या अविनाश सामलवार हिने राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर पिस्तोल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या या स्पर्धेत तिने ‘१० मीटर एअर पिस्तोल’ प्रकारात ४०० पैकी ३४२ गुण मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. तिच्या या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर आगामी जून महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय एअर पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता दडलेली असते, हे अनन्याने आपल्या यशातून पुन्हा अधोरेखित केले आहे.
अनन्या ही त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून तिच्या यशामागे कठोर मेहनत आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. संस्थेच्या अध्यक्षा ऍड. सुमीती गाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहल, सहसचिव श्रुती आमले पाटील, प्राचार्य अरविंद देशमुख आणि क्रीडा शिक्षक छबुराव काळे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन देत तिच्याकडून सातत्यपूर्ण सराव करून घेतला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच अनन्याने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अनन्याच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण आलापल्ली परिसरासह गडचिरोली जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. तिच्या राष्ट्रीय निवडीची बातमी समजताच नागरिक, क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही अनन्या चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नाव देशभर उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.










