बिहार : जमुई जिल्ह्यात उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणाने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. ग्रामीण कार्य विभागाचे कार्यकारी अभियंता गोपाल कुमार यांच्या ठिकठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यांमध्ये इतकी अफाट संपत्ती सापडली की, तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. एका सरकारी अधिकाऱ्याकडे इतका पैसा, सोनं आणि मालमत्ता कशी काय जमा झाली, याचीच आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.
ऑक्टोबर 2008 मध्ये बिहार सरकारच्या सेवेत दाखल झालेले गोपाल कुमार यांना 2022 मध्ये कार्यकारी अभियंता पदावर बढती मिळाली होती. मात्र, अल्पावधीतच त्यांनी आपल्या अधिकृत उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा तब्बल 80 टक्क्यांहून अधिक संपत्ती बेकायदेशीर मार्गाने उभी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात त्यांच्या नावावर ज्ञात उत्पन्नापेक्षा दोन कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या चार वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाचवेळी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 3 कोटी 99 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. इतकेच नव्हे, तर सुमारे 47 लाख रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदी पावत्या, 60 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोन्याचे दागिने आणि जवळपास एक किलो चांदीचे दागिनेही अधिकाऱ्यांच्या हाती लागले.
या अभियंत्याची मालमत्ता पाहून अधिकारीही चक्रावले. सगुणा मोरे परिसरातील एका व्यापारी संकुलात त्यांची सुमारे 70 लाख रुपये किमतीची दोन दुकाने असल्याचे समोर आले आहे. दानापूर बाजार समितीजवळ निवासी भूखंडावर चार मजली आलिशान इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचेही तपासात उघड झाले. एवढेच नाही, तर दानापूरमधील एका फ्लॅटसाठी त्यांनी तब्बल 80 लाख रुपये रोख दिल्याचे पुरावे आणि कागदपत्रेही अधिकाऱ्यांना मिळाली आहेत.
जमुई येथील त्यांच्या भाड्याच्या घरातून आठ लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली. दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर खरेदी केलेली महागडी चारचाकी गाडी आणि इतर वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यांच्या तीन बँक खात्यांमध्ये सुमारे दहा लाख रुपयांची रक्कम असल्याचे आढळले आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या घरातून ग्रामीण विकास विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि नस्त्या बेकायदेशीरपणे ठेवलेल्या अवस्थेत सापडल्या आहेत. याबाबत संबंधित विभागाला माहिती देण्यात येणार असून, या भ्रष्टाचाराच्या जाळ्याची मुळे नेमकी किती खोलवर रुजली आहेत, याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. बिहारमधील या कारवाईमुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे.










