गडचिरोली : जिल्ह्यात माओवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळवत गडचिरोली पोलीस दल आणि सिआरपीएफने “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत तब्बल आठ जहाल माओवाद्यांना अटक केली आहे. फोदेवाडा चकमकीत सी-60 जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्या या माओवाद्यांमध्ये दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम आणि चार सदस्यांचा समावेश आहे. तेलंगणातील विकाराबाद रेल्वे स्थानक, मौजा कुमनार आणि नैताळा परिसरात विशेष शोध मोहिमा राबवून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 64 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि रोख रक्कम जप्त केली असून त्यात 02 एलएमजी रायफल, 04 एके-47, 04 एसएलआर, 03 इंसास रायफलसह एकूण 51 अग्निशस्त्रांचा समावेश आहे. याशिवाय 65 लाख 34 हजार रुपयांची रोख रक्कम, दारुगोळा, डेटोनेटर आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्यही हस्तगत करण्यात आले. चौकशीदरम्यान माओवाद्यांनी जंगल परिसरात पोलिसांवर घातपात करण्यासाठी शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती उघड झाली होती. पोलिसांनी त्यानुसार शोध मोहीम राबवत फोदेवाडा, गुंडेनूर आणि नैताळा जंगल परिसरातून हा साठा जप्त केला.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसल्याचे मानले जात आहे. पोलिसांच्या अभिलेखावरील उर्वरित माओवाद्यांपैकी पाच जणांना अटक झाली असून एका महिला माओवादीने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यात अभिलेखावरील एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील, डीआयजी योगेश कुमार, सिआरपीएफचे डीआयजी अजय कुमार शर्मा यांच्यासह गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.










