Uncategorized

गडचिरोलीत माओवादाला मोठा धक्का; 38 लाखांच्या पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानाला आणखी एक मोठे यश मिळाले असून, पाच वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये 01 डिव्हीसीएम, 01 पीपीसीएम, 01 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवादी तसेच दोन सदस्यांचा समावेश असून, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वर एकत्रित 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विशेष म्हणजे सन 2025 पासून आतापर्यंत तब्बल 137 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव वेळदा, जिवन ऊर्फ जग्गु मडकाम, रजनी ऊर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम यांचा समावेश आहे. अनेक वर्षे विविध दल आणि तांत्रिक पथकांमध्ये सक्रिय राहिलेल्या या माओवाद्यांनी हिंसक जीवनाचा त्याग करून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 15 ऑक्टोबर 2025 रोजी माओवादी प्रवक्ता भूपती ऊर्फ सोनू याच्यासह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने दंडकारण्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरात 1063 माओवादी सदस्यांनी 637 शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राज्य आणि केंद्र शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे माओवाद्यांना नवजीवनाची संधी उपलब्ध होत असून, आत्मसमर्पण केलेल्या या पाचही सदस्यांना मिळून लाखो रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच पती-पत्नी म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्या मधु वेळदा आणि रजनी धुर्वा यांना अतिरिक्त मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सिआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष अभियान पथक आणि सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोलीत शांतता आणि विकासाचा मार्ग अधिक मजबूत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.