जिल्हा ताज्या बातम्या

खाटा नाहीत, सुरक्षेची हमीही नाही! गडचिरोलीतील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह जिल्ह्यात सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने या उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, आणखी तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे. तर सर्पदंश झालेल्या दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने त्या जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच काही विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच अथवा उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसतिगृहातील विद्यार्थिनींची निवासव्यवस्था, पुरेशा खाटांचा अभाव, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत असल्याने सर्पदंशाचा धोका वाढला का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आश्रमशाळेतही हळहळ व्यक्त होत आहे.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेत कोणाचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास करावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या वसतिगृहांमध्ये सर्पप्रतिबंधक उपाययोजना, पुरेशा खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही जोर धरत आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.