अहेरी: : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर वन्यजीव तस्करांविरुद्ध छत्तीसगड वन विभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. वाघाच्या कातडीच्या आंतरराज्यीय तस्करीप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस शिपाई आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि राज्यस्तरीय विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत २९ जून रोजी रात्री पश्चिम पर्लकोट वनपरिक्षेत्रातील जनकपूर-पाखांजूर मार्गावर सापळा रचला होता. या नाकाबंदीदरम्यान दुचाकीवरून जात असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबूराव राजू मडावी (रा. गडअहेरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली) आणि बिबेश्वर विष्णू गोडाम (रा. अहेरी, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान या आरोपींकडून दोन वाघांची कातडी, १३ वाघांच्या मिशा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
वन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, हे वाघ महाराष्ट्रातील इंद्रावती व्याघ्र अधिवास परिसरात मारून त्यांची कातडी छत्तीसगडमध्ये तस्करीसाठी नेली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी गडचिरोली पोलीस दलातील फक्त एकच पोलीस शिपाई असल्याची अधिकृत माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली असून, संबंधित शिपायाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सध्या सुरू असून, दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.










