अहेरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-क वरील सुभाषनगर–मुक्तापूर–बोरी मार्गावरील मुक्तापूर नाल्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामातील हलगर्जीपणा पहिल्याच मुसळधार पावसात उघड झाला आहे. वाहतुकीसाठी कंत्राटदाराने तयार केलेला तात्पुरता माती-खडीचा रपटा (डायव्हर्शन) काल रात्री झालेल्या जोरदार पावसात पूर्णपणे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, नवीन पुलाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असून अद्याप केवळ पायाभरणीचे कामच पूर्ण झाले आहे. पावसाळा तोंडावर असतानाही कामाला अपेक्षित वेग देण्यात आला नाही. त्यामुळे रहदारी सुरू ठेवण्यासाठी कंत्राटदाराने माती व खडीचा कच्चा रपटा तयार केला होता. मात्र, नाल्याला आलेल्या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे हा रपटा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला.
या घटनेमुळे दक्षिण गडचिरोलीचा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांशी संपर्क तात्पुरता तुटला आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने, मालवाहतूक तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक प्रवासी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले आहेत.
घटनेनंतर नागरिकांनी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पहिल्याच पावसात रपटा वाहून जात असेल, तर कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. पावसाळ्यापूर्वीच पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती गती देणे गरजेचे होते,” अशी प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांनी दिली.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून रस्ता पूर्ववत सुरू करावा, तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.










