अहेरी : : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, पुसुकपल्ली येथे नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा दणदणाट, सजविलेली बैलबंडी, गावभर काढलेली मिरवणूक आणि विद्यार्थ्यांवर झालेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण गावात प्रवेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक मा. सौ. दिपाली आर. तलमले उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे टिळा लावून, पुष्पगुच्छ देऊन आणि शालेय साहित्याचे वाटप करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आकर्षक सजविलेल्या बैलबंडीत बसवून ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेविषयी आत्मीयता वाढावी आणि पालकांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचावा, या उद्देशाने शाळेने हा अभिनव प्रवेशोत्सव आयोजित केला होता. पहिल्याच दिवशी आनंदी आणि उत्सवमय वातावरण अनुभवायला मिळाल्याने नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह झळकत होता. त्यामुळे शाळेची भीती दूर होऊन शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. रागीवार मॅडम, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद भोयर, समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण पुसुकपल्ली गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हा प्रवेशोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.










