Uncategorized

दुर्गम आदिवासी भागातून यशाची झेप; आचल मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड

गडचिरोली : दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता, जिद्द आणि कठोर परिश्रमाची ताकद कमी नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अहेरी तालुक्यातील रामपूर (पोस्ट-बोरी) येथील कु. आचल सविता संजय मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव उंचावला आहे.

अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या आचल यांनी कोणताही शॉर्टकट न स्वीकारता सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, बोरी येथे झाले. त्यानंतर राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दिशा एज्युकेशन, वरोरा येथून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स, छत्रपती संभाजीनगर येथून बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदवी प्राप्त केली. पुढे शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, संभाजीनगर येथून एम.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत सहभाग नोंदवत संशोधनातील आपली क्षमता सिद्ध केली. तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच UGC-NET परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा गाठला.

या सर्व यशाच्या जोरावर त्यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी ठरत असून, मेहनत, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हा संदेश त्यांनी आपल्या यशातून दिला आहे.

आचल मोहुळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहेरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.