Uncategorized

मरपल्लीत दुहेरी संकट: आधीच वारंवार खंडित होणारी वीज, त्यात BSNL टॉवरही १० दिवसांपासून ठप्प!

अहेरी/मरपल्ली: राष्ट्रीय महामार्गावरील उमानूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मरपल्ली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या नागरिकांना अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उमानूर आणि मरपल्ली परिसरात आधीपासूनच वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची मोठी समस्या कायम आहे. सततच्या भारनियमनामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त असतानाच, आता गेल्या दहा दिवसांपासून मरपल्ली येथील बीएसएनएल (BSNL) मोबाईल टॉवर पूर्णपणे बंद पडले आहे. यामुळे आधीच विजेअभावी त्रस्त असलेल्या या संपूर्ण परिसरातील संपर्क यंत्रणाही कोलमडून पडली असून परिसर पूर्णपणे संपर्कविहीन झाला आहे.

मरपल्ली येथे पोलीस ठाणे, जिल्हा परिषद शाळा, विविध शासकीय-निमशासकीय विभागांचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण वास्तव्यास आहेत. मात्र, वीज नसणे आणि त्यातच बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे दैनंदिन संपर्क, ऑनलाईन व्यवहार, बँकिंग सेवा तसेच शैक्षणिक उपक्रम पूर्णपणे कोलमडले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दुर्गम भागात वीज आणि नेटवर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. वीज पुरवठा खंडित असताना मोबाईलचे नेटवर्कही उपलब्ध नसल्यामुळे गावात एखादी वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाल्यास रुग्णवाहिका, आरोग्य सेवा किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे ग्रामस्थांना अशक्य झाले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या गंभीर समस्येमुळे मरपल्ली आणि उमानूर लगतच्या अनेक गावांतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित वीज वितरण कंपनी आणि बीएसएनएल विभागाने या दुहेरी समस्येची तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा आणि बंद पडलेला टॉवर त्वरित सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.