अहेरी : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय व प्रशासकीय रिक्त पदे तातडीने भरावीत, या प्रमुख मागणीसाठी अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी राजे विश्वेश्वरराव महाराज चौक येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. रुग्णालयातील सर्व रिक्त पदांवर भरती होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन सुमारे वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले होते. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा तसेच दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याची अपेक्षा होती.
मात्र उद्घाटनानंतर वर्ष उलटूनही रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची अनेक पदे अद्याप रिक्त असल्याने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे कोट्यवधींची इमारत उभी असली तरी त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः अहेरी व परिसरातील दुर्गम आदिवासी भागातील गर्भवती महिला, नवजात बालके आणि बालरुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 80 ते 100 किलोमीटरचा प्रवास करून रुग्णालयात पोहोचणाऱ्या रुग्णांना पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ नसल्यामुळे आवश्यक उपचार वेळेत मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
या मागणीसाठी सोमवारी अमोल मुक्कावार यांनी महिला व बाल रुग्णालय परिसरात ‘ताळे ठोको’ आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून मुक्कावार यांच्यासह चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणस्थळी बोलताना अमोल मुक्कावार म्हणाले, “महिला व बाल रुग्णालयातील सर्व रिक्त पदांवर नियुक्त्या होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. ही लढाई कोणत्याही व्यक्तीची नसून अहेरी परिसरातील माता, भगिनी आणि बालकांच्या आरोग्य हक्कासाठी आहे.”
या आंदोलनाची दखल आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात घेतली जात असून स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार आणि शासन-प्रशासन नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय कधी घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










