Uncategorized

वैद्यकीय- अभियांत्रिकी स्वप्नांना बळ; भामरागडच्या विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण

गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमाला यश मिळाले आहे. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तब्बल २६ विद्यार्थ्यांची NEET आणि JEE च्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये NEET प्रशिक्षणासाठी ११ मुलगे आणि १४ मुलींचा समावेश असून JEE साठी एका विद्यार्थिनीची निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे अमरावती आणि नागपूर विभागातून निवड झालेल्या एकूण १०० विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी हे केवळ भामरागड प्रकल्पातील आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मार्च २०२६ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. पुढील दोन वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार, नियमित आणि स्पर्धात्मक वातावरणात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांसाठी हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील शासकीय आश्रमशाळेत, तर मुलींसाठी वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील शासकीय आश्रमशाळेत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग आणि Physics Wallah यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना NEET आणि JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या यशासाठी भामरागडचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत, सहायक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नागपूर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त Ayushi Singh यांनी अभिनंदन केले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.