चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्षाची आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.
वनिता शंकर उईके (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवार (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास किटाळी मेंढा येथील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वनिता उईके या इतर चार-पाच महिलांसह वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ६९ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. रोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असलेल्या या महिला नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक वनिता उईके या इतर महिलांच्या नजरेआड झाल्या.
काही वेळ उलटल्यानंतरही त्या दिसून न आल्याने सोबतच्या महिलांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्या कुठेच आढळून न आल्याने त्यांनी गावात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले असता, एका पट्टेदार वाघाने वनिता उईके यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर वाघ मृतदेहाजवळ बसून त्यावर भक्ष्य करत असल्याचे भयावह दृश्य प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस विभाग तसेच वन विकास महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकाटे, वन विकास महामंडळाचे एस. टी. वाढीवा आणि वन परिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
दरवर्षी हजारो मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात असतात. मात्र जंगल परिसरात वाढलेल्या वाघांच्या हालचाली आणि वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वनिता उईके यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जंगलाशी संघर्ष करत उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या असुरक्षित वास्तवाची ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.










