Chandrapur : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठीची विधान परिषद निवडणूक येत्या 18 जून 2026 रोजी पार पडणार असून, तीनही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.
मतदारसंख्येच्या दृष्टीने Chandrapur जिल्हा आघाडीवर असून येथे 469 सदस्य मतदार आहेत. तर Wardha जिल्ह्यात 264 आणि Gadchiroli जिल्ह्यात 244 स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेसह 10 नगर परिषद व 7 नगर पंचायतींतील सदस्यांचा यात समावेश आहे. गडचिरोलीतील 3 नगर परिषद आणि 9 नगर पंचायती, तसेच वर्ध्यातील 10 नगर परिषदांतील सदस्यही मतदान करणार आहेत.
दरम्यान, 18 मेपासून तीनही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी तीनही जिल्ह्यांतील उपविभाग मुख्यालयांमध्ये एकूण 17 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया चंद्रपूर जिल्हास्तरावर पार पडणार असून निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.










