तेलंगणा : एकेकाळी हातात एके-४७ घेऊन जंगलात माओवादी चळवळीचे नेतृत्व करणारा देवजी उर्फ तिप्पिरी तिरुपती आज पुन्हा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण वेगळे आहे. केंद्रीय समितीचा सदस्य आणि माओवादी मिलिटरी कमांडचा प्रमुख राहिलेला हा माजी नेता आता परीक्षा हॉलमध्ये इंटर सेकंड इयरची परीक्षा देताना दिसला. समोर उत्तरपत्रिका, हातात पेन आणि नव्या आयुष्याची उमेद घेऊन बसलेला देवजी अनेकांसाठी आश्चर्य आणि चर्चेचा विषय ठरत आहे.
माओवादी संघटनेत ‘रमेश अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा देवजी २००० पर्यंत गडचिरोली भागात अत्यंत सक्रिय होता. संघटनेत त्याची ओळख प्रभावशाली रणनीतीकार म्हणून होती. शेकडो माओवादी कॅडर तयार करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. अहेरीचे तत्कालीन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अपहरण प्रकरणातही त्याच्या सहभागाचा आरोप झाला होता. चार दशकं जंगलातील संघर्ष, चकमकी आणि भूमिगत जीवन जगल्यानंतर त्याने आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात पुनरागमन केले.
देवजीने १९८४-८५ मध्ये इंटर सेकंड इयरची परीक्षा दिली होती; मात्र तेलगू विषयात अपयश आल्याने त्याचे शिक्षण अर्धवट राहिले. त्याच काळात तो क्रांतिकारी विचारसरणीकडे वळला आणि पुढे ‘रॅडिकल स्टुडंट युनियन’मधून सक्रिय होत जंगलाची वाट धरली. पुस्तकाऐवजी हातात बंदूक आणि शिक्षणाऐवजी संघर्षाचे आयुष्य आले. मात्र आता आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने पुन्हा शिक्षणाचा ध्यास घेत इंटर बोर्डाच्या परवानगीने अॅडव्हान्स सप्लिमेंटरी परीक्षा दिली.
विशेष म्हणजे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेऊन गरीब आणि वंचितांसाठी काम करण्याची इच्छा देवजीने व्यक्त केली आहे. “बंदुकीच्या मार्गाने नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत राहून समाजासाठी लढायचं,” अशी त्याची भूमिका असल्याचे सांगितले जाते. जंगलातील संघर्षातून परीक्षा हॉलपर्यंत पोहोचलेला देवजीचा हा प्रवास केवळ एका माजी माओवादी नेत्याची कहाणी नसून बदलत्या विचारांची, नव्या आशेची आणि शिक्षणाच्या सामर्थ्याची जिवंत उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.










