गडचिरोली, दि. ८ सप्टेंबर : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले असून, परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या सूचना व ठोस शिफारशी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालून गुणवंत उमेदवारांना न्याय देणारी सक्षम परीक्षा व्यवस्था उभारण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने विद्यमान शासकीय भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत प्रत्येक महसूल विभागातील हितधारकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, शिफारशी, हरकती व अनुभव जाणून घेतले जाणार आहेत. समितीचे अध्यक्ष व सदस्य १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे संबंधितांशी थेट संवाद साधणार आहेत. तसेच नागपूर महसूल विभागातील नागरिकांसाठी ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान विशेष अभिप्राय कक्ष कार्यरत राहणार असून, प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्यांना ई-मेलद्वारेही सूचना पाठविता येणार आहेत.
भरती परीक्षा प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका निर्मिती, मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, मूल्यांकन व निकाल प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत. तसेच बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, सीसीटीव्ही, डिजिटल ऑडिट ट्रेल, पेपरफुटी रोखण्याच्या उपाययोजना, तोतया उमेदवारांना प्रतिबंध, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखणे आणि गैरप्रकारांसाठी जबाबदारी निश्चित करणे या विषयांवरही अभिप्राय देता येणार आहे. परीक्षा केंद्रांची पायाभूत सुविधा, सुरक्षितता, मनुष्यबळ, जिल्हा प्रशासन-पोलीस-शिक्षण विभाग व परीक्षा संस्थांमधील समन्वय तसेच उमेदवारांच्या तक्रारींचे जलद व पारदर्शक निवारण याबाबतही नागरिकांनी सूचना कराव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवक शासकीय भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून परीक्षा व्यवस्थेतील अडचणी आणि सुधारणा याबाबत महत्त्वपूर्ण सूचना पुढे येऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील परीक्षार्थी, पालक, शिक्षक, अभ्यासिका व कोचिंग क्लासेसचे संचालक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या संधीचा उपयोग करून विधायक व ठोस अभिप्राय द्यावा, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आवाहन केले आहे. प्राप्त सूचनांचे संकलन करून त्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार असून, त्याआधारे राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी अंतिम अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.










