सिरोंचा : सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर रंगयापल्ली गावाजवळ मंगळवारी सकाळी एसटी बस आणि काळीपिवळी टॅक्सीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात काळीपिवळीतील सुमारे दहा प्रवासी जखमी झाले असून, व्येंकट मूडमडीगेला (५२), सुकमार बेडकी (४९) आणि शेख कासीम (६५), रा. जाफराबाद यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा बसस्थानकातून एसटी बस अहेरीच्या दिशेने जात असताना कोटामल व रंगय्यापल्ली गावाजवळील धोकादायक वळणावर जाफराबादकडून भरधाव वेगाने येणाऱ्या काळीपिवळी टॅक्सीची बसला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की टॅक्सीच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; गंभीर जखमी तिघांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिल्लीवार व पोलीस अंमलदार तपास करीत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे सिरोंचा–आलापल्ली महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महामार्गाच्या संथ कामाचा फटका; वाहनचालकांत संताप — सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू असले तरी अनेक ठिकाणी अद्यापही रस्ता अपूर्णावस्थेत आहे. धोकादायक वळणे, अपूर्ण काम आणि अपुऱ्या सुरक्षितता उपायांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत असतानाही अपेक्षित वेगाने काम होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. “महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहायची आणि अपघात आणखी किती जीव घेणार?” असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.










