Uncategorized

चंद्रपुरात वाघिणीचा थरारक हल्ला! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांवर झडप; 4 जणींचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या वाघिणीने तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गटावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याची ही दुर्मिळ आणि गंभीर घटना मानली जात आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील ‘भट्टी मोहल्ला’ परिसरातील 13 महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. खैरीचक परिसरातील दाट जंगलात त्या काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या एका मादी वाघिणीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की महिलांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.

वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर महिलांनी प्रसंगावधान राखत जंगलातून जीव वाचवत पळ काढला. आपल्या सहकाऱ्यांना वाघिणीने ओढून नेत असल्याचे भयावह दृश्य पाहून उर्वरित महिला प्रचंड हादरल्या आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही महिला एकाच वॉर्डातील असून परस्पर नातेवाईक असल्याने गुंजेवाही गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —

कविता दादाजी मोहुर्ले (45)

अनिता दादाजी मोहुर्ले (46)

संगीता संतोष चौधरी (40)

सुनीता कौशिक मोहुर्ले (35)

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. तसेच या परिसरात वाढत्या वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.