जिल्हा ताज्या बातम्या

मलेरियाला हद्दपार करण्यासाठी आलदंडीकरांचा निर्धार; आरोग्य विभागाच्या जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

भामरागड : तालुक्यातील आलदंडी गाव मलेरियामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवली. प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरीअंतर्गत मलेरिया प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या फवारणीच्या ‘फोकल राऊंड’ची पाहणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी गावात दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांना मलेरियाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तातडीच्या उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “मलेरियाला हद्दपार करू आणि आलदंडी गाव मलेरियामुक्त करू” असा सामूहिक निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक घरामध्ये नियोजित फवारणी पूर्ण करून घेणे आवश्यक असून, फवारणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मच्छरदाण्यांचा नियमित वापर करावा, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी माहिती नागरिकांना देण्यात आली. मलेरियाविरोधातील लढ्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी विलंब न करता आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधून रक्तनमुना तपासणी करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. रक्ततपासणीत मलेरियाचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने आणि संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. आजार लपविणे अथवा उपचार अर्धवट सोडणे धोकादायक ठरू शकते, याबाबतही ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले.

मच्छरदाणीचा नियमित वापर करणे, घरातील फवारणी पूर्ण करून घेणे, मलेरियाची लक्षणे दिसताच रक्ततपासणी करणे आणि निदान झाल्यास संपूर्ण उपचार घेणे, अशी सामूहिक शपथ ग्रामस्थांनी घेतली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा व्हीबीडी सल्लागार राजेश कार्लेकर, कुष्ठरोग पर्यवेक्षक प्रकाश गवारे, टीसीआय फाउंडेशनचे तालुका समन्वयक संतोष झाडे, समुदाय समन्वयक मनीषा आत्राम, लाहेरीच्या गटप्रवर्तक महानंदाताई, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक वडे, नैताम, सीडाम, फवारणी कर्मचारी धोटे व त्यांची चमू, तालुकास्तरीय आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.