क्राईम जिल्हा ताज्या बातम्या

गडचिरोली वनवृत्तात खळबळ; आसरअल्लीचे क्षेत्र सहाय्यक विनोद गोल्लेवार निलंबित

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तात खळबळ उडवून देणारी कारवाई समोर आली असून, सिरोंचा वनविभागांतर्गत आसरअल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्र सहाय्यक विनोद रामजी गोल्लेवार यांच्यावर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. थेट मुख्य वनसंरक्षक स्तरावरून झालेल्या या कारवाईमुळे वनविभागातील प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, आसरअल्ली येथील क्षेत्र सहाय्यक पद यापूर्वीही वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. याच पदावर कार्यरत असलेल्या तत्कालीन क्षेत्र सहाय्यक कादिर शेख यांच्यावर सागवान तस्करी प्रकरणात तत्कालीन उपवनसंरक्षक पूनम पाटील यांच्या कार्यकाळात निलंबनाची कारवाई झाली होती. आता पुन्हा याच पदावरील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील प्रशासकीय कारभाराबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

निलंबनाच्या कालावधीत गोल्लेवार यांचे मुख्यालय उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, भामरागडच्या उपवनसंरक्षकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच गोल्लेवार यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून प्रारूप दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना उपवनसंरक्षक, सिरोंचा यांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, निलंबनाच्या कारवाईमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. याबाबत आसरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी पानगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. निलंबनाच्या कारणाचा सखोल अभ्यास सुरू असून, याबाबत लवकरच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्य वनसंरक्षकांनी थेट केलेल्या या कारवाईमागील नेमके प्रकरण काय आहे, याकडे आता वनविभागासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.