अहेरी : तब्बल १८ वर्षांपासून चर्चेत असलेल्या बहुचर्चित चिंकारा शिकार प्रकरणाला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे. दोन चिंकारा हरणे व दोन सशांची शिकार केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व आठ आरोपींची सासवड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या निर्णयामुळे २००८ पासून सुरू असलेल्या या प्रदीर्घ न्यायालयीन प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.
२००८ पासून सुरू होता न्यायालयीन प्रवास : पुणे जिल्ह्यातील चौधरवाडी परिसरात दोन चिंकारा आणि दोन सशांची शिकार केल्याचा आरोप तत्कालीन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर ठेवण्यात आला होता. वन विभागाच्या तक्रारीवरून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ तसेच भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आत्राम यांच्यासह मित्र, चालक आणि सुरक्षा रक्षक अशा एकूण आठ जणांना आरोपी करण्यात आले होते. तत्कालीन तपास यंत्रणेकडून कागदपत्रे व सरकारी साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली होती; मात्र विविध कायदेशीर व प्रक्रियात्मक कारणांमुळे खटला दीर्घकाळ प्रलंबित राहिला.
साक्षीदार हजर करण्यात अभियोजन पक्ष अपयशी : न्यायालयीन आदेशानुसार, अभियोजन पक्षाला अनेक वेळा संधी देऊनही साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करता आली नाही. १० एप्रिल २०२६ नंतर १४ मे, २४ जून, ७ जुलै आणि २१ जुलै रोजी सुनावणीच्या तारखा देण्यात आल्या; मात्र खटला पुढे नेण्यासाठी अपेक्षित प्रभावी कार्यवाही झाली नाही. केवळ भविष्यात अभियोजन पक्ष आवश्यक पावले उचलेल या अपेक्षेवर फौजदारी कार्यवाही अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २४७ अन्वये कार्यवाही समाप्त करण्यात आली.
१८ वर्षांच्या प्रकरणातून आत्राम यांना मोठा दिलासा : या प्रकरणामुळे डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजकीय कारकिर्दीवर अनेक वर्षे परिणामकारक चर्चा झाली. आरोपानंतर त्यांना मंत्रिपद गमवावे लागल्याचा संदर्भही या प्रकरणाशी जोडला गेला. तब्बल १८ वर्षांनंतर न्यायालयीन कार्यवाही समाप्त झाल्याने आत्राम यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. त्यांच्या समर्थकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नागरिक-कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण : या निर्णयाची माहिती समोर आल्यानंतर अहेरी परिसरात नागरिक आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. दीर्घकाळ चर्चेत असलेल्या प्रकरणाचा न्यायालयीन शेवट झाल्याने आत्राम समर्थकांसह त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, न्यायालयाने हा निर्णय आरोपांचे पुरावे तपासून आरोपी दोषी नसल्याचे ठरवून दिलेला नसून, अभियोजन पक्षाकडून साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात आलेल्या अपयशामुळे कायद्यानुसार कार्यवाही समाप्त केली आहे. त्यामुळे २००८ पासून सुरू असलेल्या चिंकारा शिकार प्रकरणाच्या प्रदीर्घ न्यायालयीन प्रवासावर अखेर पडदा पडला आहे.










