गडचिरोली : जिल्ह्याच्या वनसंपदेला रोजगार, कौशल्य विकास आणि स्थानिक उद्योगाची जोड देणाऱ्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण मंगळवारी (२५ ऑगस्ट) शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे उत्साहात करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या ‘नाविन्यपूर्ण योजना २०२४-२५’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक सौ. दिव्यभारती (भा.व.से.), विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, भामरगडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ आणि तहसीलदार बालाजी सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकीय आराखडा तयार करण्यात आला असून, त्यापैकी १ कोटी ५९ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेतून हे आधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे आधुनिक प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच GeM पोर्टलच्या माध्यमातून अत्याधुनिक काष्ठ प्रक्रिया मशिनरी खरेदी करून ती केंद्रात बसविण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक काष्ठ प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, स्थानिक लाकडापासून दर्जेदार आणि मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती शक्य होणार आहे.
आलापल्ली व परिसरातील स्थानिक तरुणांना अत्याधुनिक काष्ठ प्रक्रियेचे मोफत प्रात्यक्षिक आणि कौशल्य विकास प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तसेच केंद्रात प्रत्यक्ष रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर उपलब्ध लाकडाचा वापर करून ‘कस्टमाइज्ड फर्निचर डिझाईन’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन मजबूत, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक फर्निचर तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होईल.
या केंद्राचा लाभ केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित राहणार नसून, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आणि शाळांसाठी आवश्यक फर्निचर याच केंद्रातून तयार करून पुरविण्याची योजना आहे. त्यामुळे स्थानिक सुतार, कारागीर आणि लघुउद्योजकांना मोठ्या प्रमाणात काम मिळण्याची शक्यता आहे. परिणामी त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मौल्यवान सागवान लाकडाला स्थानिक पातळीवरच मूल्यवर्धन करून त्याचे अंतिम उत्पादन तयार करण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही हे केंद्र महत्त्वाचे ठरत आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रात मोठ्या संख्येने महिलांना रोजगार मिळाला असून, सागवान लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते रोजगार मिळालेल्या महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे काष्ठ प्रक्रियेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य, रोजगार आणि आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळत आहे.
‘मेक इन डिस्ट्रिक्ट’ संकल्पनेला मिळणार बळ
गडचिरोलीतील लाकूड बाहेर पाठविण्याऐवजी त्यावर जिल्ह्यातच प्रक्रिया करून अंतिम वस्तू तयार करण्याची ‘मेक इन डिस्ट्रिक्ट’ संकल्पना या केंद्रामुळे प्रत्यक्षात येणार आहे. स्थानिक कच्च्या मालाचे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन झाल्याने जिल्ह्याचा पैसा जिल्ह्यातच राहून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. वनसंपदेचा स्थानिक विकासासाठी योग्य आणि नियोजनबद्ध वापर करताना रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. “जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळ उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील मौल्यवान सागवान लाकडापासून विविध वस्तू व फर्निचर तयार करून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा प्रयत्न आहे,” असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले. प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक, महिला आणि कामगारांनी स्वागत केले आहे.










